लोकशाहीतील सत्ता नात्यांच्या आधीन कां?
भारत एक विशाल लोकशाही असलेला देश आहे. भारतात सत्ता प्राप्त करण्यासाठी निवडणूक हा एकमेव मार्ग आहे. या निवडणुकीत जो जिंकून येईल त्याच्या हातात सत्ता प्रस्थापित होते. सत्तेचे सर्व बीज त्याच्याच हाती आल्याने काहीठिकाणी मनमानी ही दिसते. भविष्यातला भारत घडवण्यासाठी निघालेले हे नेते कधी आपला विकास करून घेतात हे सर्वसामान्यांच्या कधीच लक्षात येत नाही.
या राजकारणाला सध्या एक नवा रंग येतांना दिसतो किंवा तसा प्रयत्न होतांना दिसतो; जो अजिबात विचारणीय नाही आहे. राजकारणाला एक नवा नात्यांचा विळखा घातला जात आहे. एखाद्या नेत्याने त्याच्या जागेवर त्याच्याच कुटुंबातील किंवा नात्यातील व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आणि तो हरला तर लगेच सर्व लोकांच्या भिवया उंचावतात. आणि चर्चेला उधान येते. तो अमक्या टमक्याचा हा होता आणि लोकांनी त्याला नाकारले. त्याची सत्ता संपुष्टात आली. पण लोक हे समजून घ्यायला तयार नाहीत की निवडणुकीतील विजय हा लोकशाहीचा विजय आहे. ज्याला सर्वांनी स्वीकारायला हवे. उमेदवार एखाद्या खंद्या नेत्याची मुलगी / मुलगा असला याचा अर्थ तो निवडून यायलाच पाहिजे असे नाही. त्यासाठी अनुभव, नेतृत्व, कर्तृत्व, आणि डोकं हवं असतं. आत्ताच महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणूका झाल्या. या निवडणुकीत सर्व परिचित पाटोदा गावाची निवडणूक जास्त चर्चेचा विषय ठरली. कारण का तर येथे गेल्या २५ वर्षापासून बिनविरोध निवडून येणारा सरपंच मा. भास्करराव पेरे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली. व राजकारणात आपल्याला आता सत्ता भोगायची नाही असे स्पष्ट केले. त्यानंतर त्यांचीच मुलगी या सरपंच निवडणुकीत उभी राहिली. आणि काही मतांनी त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. यात अनेक लोकांनी गत सरपंचांना प्रश्न विचारले. तुमची मुलगी का हारली? तुमच्या काळात गावाला आदर्श गाव म्हणून ओळख मिळाली. गावात सर्व सुविधा मिळाल्या. गावाला शेकडो पुरस्कार मिळाले. माराष्ट्रातील प्रत्येक नेत्याने तुमच्या गावाला भेट दिली. असे सर्व वैभव तुमच्या मेहनतीने गावाला मिळाले तरी तुमची मुलगी का पडली? मीडियाही त्यांच्या भोवती घेरा घालून हाच प्रश्न विचारत होती. जळगाव जिल्ह्यातील माजी राष्ट्रपती मा. श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या कोणी नात्यातील व्यक्ती ग्रामपंचायत निवडणुकीत पराभूत झाली. त्याचीही चर्चा संपूर्ण मिडीयाने व लोकांनी चघळून चघळून केली. पण मला हे कळत नाही की, जे बापाने करून दाखवले कदाचित ते मुलीला करता येईलच असे नाही. कदाचित लोकंना मा. भास्कररावांवर जेवढा विश्वास होता तेवढा त्यांच्या कन्येवर नसेल. अथवा गाव त्यांच्या राजकारणातील निर्वूत्तीने दुःखी झाले असतील. म्हणून हे गरजेचे नाही कि ते कोणाचे कोण आहेत. परंतु हे निच्छितच महत्वाचे आहे कि राजकारणातील हे चढउतार मनस्वी स्वीकारून लोकशाहीचा विजय केला पाहिजे.
हा विषय इथवरच थांबत नाही. तर त्याची सत्ता का आली नाही म्हणून रोष सुरु होऊन दुसर्याच्या कामात विघ्न आणली जातात. व सूड भावनेने हे राजकारण खेळले जाते. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक रंग पाहायला मिळालेत. कुठे एकाच घरातील सासू-सून एकमेकांच्या विरोधात उभे होते तर कुठे नंदा-भावजया, कुठे जाऊबाई विरुध्द जाऊबाई. गावाच्या राजकारणासाठी व सत्तेच्या लालसेसाठी कुठे कोत्यावाधींच्या बोल्या लागल्या तर कुठे लाखोंच्या. घरातच या राजकारणाने भानगडी उभ्या केल्या. कुठे कुठे घरातील वादातील मस्ती या सार्वजनिक राजकारणात जिरवण्याचा प्रकारही झाला. जे शहरात राहतात ते गावाच्या निवडणुकीत उभे राहिले ज्यांना निवडणुकीच्या वेळी गावाने पहिल्यांदाच त्यांना पहिले. मग ही लोकशाहीच्या विजयाची निवडणूक कशी ठरू शकते? जर सत्ता काबीज करणे एवढेच महत्व फक्त निवडणुकांना देणे कितपत योग्य आहे?
राष्ट्रीय स्तरावरील राजकारणात हीच गत पाहायला मिळते. राजकारण व निवडणुका लढणे हा एक लोकशाहीच्या विजयाचा उत्सव राहिला नसून तो एक नात्यांमध्ये व सत्तेच्या हव्यासात चोळामोळा झालेला आतल्या गाठीचा गुंता झाला आहे हेच खरे. कारण या निवडणुकीमुळे अनेक ठिकाणी तुफान मारामारी ही होतांना दिसल्या. अनेक संवेदनशील परिस्थितींना सामोरे जावे लागले. अनेकांची नाती दुरावली. अनेकांतील वर्षापासूनची जुनी मैत्रीला तडा गेला. गावात गटबाजी वाढली. गावातील खेळीमेळीचे वातावरण दुषित झाले. पैशांच्या लालसेत मते विकणारा व विकत घेणारा दोघे निर्माण झाले. या विकतच्या मतांमुळे लोकांची वाणी कायमची गुलाम झाली. या सर्व प्रकारांचा विचार केल्यास मनात अनेक प्रश्न घर करून जातात; खरच भारतात लोकशाही आहे?, भारतातील लोकाहाहीचा कळस खरच उंचावर नेता येईल?, भारतीय राजकारण्यांचा हेतू कोणता सत्ता काबीज करणे कि देशाचा विकास सोडून स्वतःचा विकास करणे? देश महत्वाचा की सत्ता? राजकारणाच्या या भानगडीत नवीन पिढीचे या देशात काय होणार? देशाच्या छुप्या देशद्रोहाला कोण जबाबदार? राजकारण माणसासाठी की माणसं राजकारणासाठी?
खरचं विचारणीय .....!!!
धन्यवाद !
-योगेश जाधव
शिक्षक, लेखक, ब्लॉग राई
टिप्पण्या