मी योगेश जाधव (शिक्षक, लेखक, कवी) आपल्या DNYAN SAGAR या वेबपेजवर आपले हार्दिक स्वागत करतो.|

अक्षय तृतीया माहिती

 अक्षय तृतीय माहिती :

                    भारतीय संस्कृतीत अनेक उत्सव येतात. हे सर्व सण उत्सव विविध भागात विविध प्रकारे व महत्वाने साजरे केले जातात. या प्रत्येक सणाला वेगवेगळी नावे देखील आहेत. भारतीय संस्कृतीत अनेक सण मानवी जीवनाच्या शेती प्रवृत्तीशी निगडीत आहेत. त्याची जीवनाला उभारी आणणाऱ्या सणांपैकी एक सण म्हणजे अक्षय तृतीय होय. या सणाची माहिती खालील पीडीएफमध्ये दिलेली आहे.

          अक्षय्य तृतीया हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशेष आहे. या दिवसाला आखा तीज असेही म्हटले जाते. ह्या दिवशी अन्नपूर्णा (देवी) जयंती, नर-नारायण या जोडदेवाची जयंती, परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती आणि, हयग्रीव जयंती असते. या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांचे लेखनिक म्हणून गणपतीने काम केले अशी आख्यायिका प्रचलित आहे.

महत्त्व

  • या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दार उघडतात. हे मंदिर अक्षय्य तृतीयेला उघडल्यावर दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होते.[८]
  • नर-नारायण या दोन देवतांनी या दिवशी अवतार घेतला होता असे मानले जाते.
  • परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते असे मानले जाते. या दिवशी परशुरामाची पूजा केली जाते.
  • वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरणदर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात.
  • जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो पापांतून मुक्त होतो अशी भारतीय संस्कृतीत धारणा आहे.
  • कृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की, 'या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षय्य तृतीया असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (‍अविनाशी) होते'.
  • या दिवशी गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले अशीही आख्यायिका प्रचलित आहे.
सांस्कृतिक महत्त्व :
        महाराष्ट्रातील स्त्रिया चैत्र महिन्यात चैत्रगौरीची स्थापना व पूजा करतात. चैत्रातील एखाद्या दिवशी हळदीकुंकवाच्या निमित्ताने बायकांना घरी बोलावून मोगऱ्याची फुले किंवा गजरा, आंब्याची डाळ (किंवा भिजवलेले हरबरे) आणि पन्हे देतात. त्या हळदीकुंकू समारंभांचा (गौरी उत्सवाचा) अक्षय्य तृतीया हा शेवटचा दिवस असतो.

आख्यायिका
           अक्षय्य तृतीयेला कृत युग संपून त्रेतायुग सुरू झाले असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रात कृत, त्रेता, द्वापर आणि कलियुगाची सर्व वर्ष मिळून होणाऱ्या काळाला ‘महायुग' असे म्हणतात. ही चार युगे महायुगाचे चार चरण असल्याचे मानले जाते. ब्रह्मदेवाच्या दिवसाचा जो प्रारंभ त्याला ‘कल्पादीं' तसेच त्रेतायुगाचा (१२,९६,००० सौर वर्षाएवढा त्रेतायुगाचा काळ) प्रारंभ म्हणजे ‘युगादी' ही तिथी वैशाख शुद्ध तृतीयेला येते.मात्र त्रेतायुग नेमक्या कोणत्या वर्षी सुरू झाले त्याची माहिती मिळत नाही.

शेतीसंबंधी प्रथा
या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा होते.

मातीत आळी घालणे व पेरणी : अक्षय्य तृतीयेनंतर पावसाळा येणार असतो. गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे मशागत करण्याचे काम अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूर्ण करायची प्रथा आहे. (मशागत म्हणजे नांगरलेल्या शेतजमिनीची साफसफाई करून खत मिश्रित मातीच्या थरांना खालीवर करणे.) या दिवशी मशागत केलेल्या जमिनीतील मृत्तिकेबद्दल कृतज्ञ भाव ठेवून काही शेतकरी पूजन केलेल्या मृतिकेमध्ये आळी घालतात. कोकणात या दिवशी शेतात बियाणे पेरण्याची प्रथा आहे, देशावर नाही. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास सुरुवात केल्यास त्या बियाणांपासून विपुल धान्य पिकते व कधीही बियाणाला तोटा पडत नाही, अशी धार्मिक समजूत आहे. (बियाणे म्हणजे मळणीतील धान्य आपल्या आवश्यकतेनुसार खाण्यासाठी बाजूला काढून घेऊन पुढच्या पेरणीसाठी राखून ठेवलेले उरलेले धान्य.)
महाराष्ट्राच्या कोकण भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्या कारणाने एकदा पावसाला सुरुवात झाली की, सतत पाऊस पडत राहिल्याने सुपीक जमिनीतील चिकट मातीमध्ये आळी करून बियाणे पेरणी करणे शक्य होत नाही. त्यामुळे पावसाळा तोंडावर असतांना मशागत केलेल्या भुसभुशीत मातीमध्ये बियाणे पेरणे सोपे जाते.

वृक्षारोपण : अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात अशी समजूत आहे. आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर रोवल्यास या वनस्पतींचा क्षय होत नाही, म्हणजेच औषधी वनस्पतींचा तुटवडा भासत नाही, अशी समजूत आहे.

अक्षय तृतीय ची माहिती येथे डाउनलोड करा :

धार्मिक आचार
               हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. या दिवशी मातीचे मडके आणून, त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकतात. त्याने या पाण्याला सुगंध येतो.पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात तांदळाची खीर, कैरीचे पन्हे किंवा चिंचोणी, पापड, कुरडया इत्यादी वाढतात. सुगंधित पाण्याने भरलेला घट ब्राह्मणाला दान करतात. असे केल्याने पितरांचा संतोष होतो असे मानले जाते. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ 'अक्षय्य'(न संपणारे) असे मिळते, असा समज आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सदोदित सुख व समृद्धी प्राप्‍त करून देणाऱ्या देवतेच्या कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही, अशी समजूत आहे.

टिप्पण्या

Have any doubt ?
तुम्ही माझ्या DNYAN SAGAR -https://www.yogeshjadhave.com या वेबसाईट ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

Archive

संपर्क फॉर्म

पाठवा