माझ्या कविता
माझ्या कविता .....
मराठीतील सुरुवातीची काव्ये म्हणजे संतकाव्ये, भक्तिकाव्ये आणि लोककाव्ये होत.एकूण मराठी काव्यांत गाथा, लावणी, पोवाडे, ओव्या, आरत्या,भजने, गवळणी, भारूडे, भोंडल्याची गाणी इत्यादींचा समावेश होतो. मराठी भाषेत संतकाव्य मोठ्या प्रमाणात लिहिले गेले. पंडिती काव्य, छंदोबद्ध काव्य, चारोळी, चित्रपट गीते, नाट्य संगीत यांचा समावेश होतो.सुरुवातीचे मराठी काव्य — कवी मुकुंदराज यांना मराठीचे आद्यकवी म्हणून संबोधले जाते. त्यांनी विवेकसिंधू हा काव्यग्रंथ लिहिला आहे.
इ.स. १८८५ ते १९८५ एवढ्या दीर्घ कालमर्यादेचे अभ्यासाच्या दृष्टीने चार खंडांत विभाजन केले आहे.
१८८५ ते १९२०
पहिला खंड हा या कालमर्यादेचा असून केशवसुत व त्यांचे समकालीन यांच्या अर्वाचीन काव्यातील परंपराशरणता या विषयींची वैशिष्ट्ये नमूद करणारा आहे.
दुसरा खंड -१९२०-१९४५
या काळात उदयाला आलेले रविकिरण मंडळ व नवपूर्वकाव्यातील कवी-कवयित्री यांच्या काव्यविषयक जाणिवांचा आढावा घेतला आहे.
तिसरा खंड - १९४५-१९६०
या काळात कवी मर्ढेकरांसारखा नवकवी होऊन गेला. मर्ढेकरांनी आणलेली नवकविता आणि त्यानंतर नवकाव्याचा झालेला विकास हे या खंडाचे वैशिष्ट्य आहे. स्वातंत्र्योतर कालखंडात नवकवी म्हणून उदयास आलेल्या मर्ढेकरांना त्यांची कविता न समजणारे लोक लिंगकवी म्हणून संबोधत असत
चौथा खंड १९६० ते १९८५
लघुनियतकालिकांतील कविता, भावकवींचे वेगळेपण, साम्यवादी कविता, दलित-आदिवासी कविता व अर्वाचीन मराठी काव्यप्रकार. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेमध्ये राजकीय नेते, विचारवंत, पत्रकार, लेखक यांच्याबरोबर कवी आणि शाहिरांनीही महत्त्वाची भूमिका बजावली . कविवर्य वसंत बापट, शाहीर शाहीर अमर शेख यांच्यासारख्या कवींच्या कविता आणि पोवाड्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जान आणली. अर्थात महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेत अशा जोशपूर्ण काव्याने महत्त्वाची भूमिका बजावली असली तरी मराठी कविता तेवढ्यापुरती सीमित नव्हती. साठोत्तरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कवितेवर प्रभाव होता तो केशवसुतांचा. रोमॅन्टिक वास्तववाद, रविकिरण मंडळाची सौंदर्यलक्षी कविता आणि मर्ढेकरांची वास्तववादी दृष्टी या साऱ्यांचाच. बरीचशी मध्यमवर्गीय जाणिवेची, ग्रामीण विश्वाचे थोडेसे कृतक बेतलेली व रोमॅन्टिक वर्णन करणारी कविता या काळात लिहिली जात होती. अशा वेळी मर्ढेकरांच्या रूपाने मराठी कवितेला हादरवून सोडणारे एक वादळ आले. हे वादळ इतके जबरदस्त होते की, आजही त्याच्या खुणा मराठी कविता पुसू शकली नाही. (उदा. संजीव खांडेकरांचे सर्च इंजिन) मर्ढेकर, शरदचंद्र मुक्तिबोध, विंदा करंदीकर, पुढे सदानंद रेगे यांच्यासारख्या कवींनी खऱ्या अर्थाने मराठी कवितेला नवा चेहरा दिला. केवळ आशयसूत्रांतच वेगळेपण आणले असे नाही तर हा बदल दाखविण्यासाठी त्यांनी विविध कविता#रचनाबंधांचा वापर केला, तसेच भाषेचीही मोडतोड केली. साठोत्तरी कविता यांच्या पावलावर पाऊल टाकतच पुढे गेली.
महाराष्ट्रभरातील खेड्यापाड्यांतले लोक वेगवेगळ्या बाजाची कविता लिहू लागले. ना.धों. महानोर यांनी ग्रामीण कवितेला दिलेला मातीचा स्पर्श हा अनेक कवींच्या कवितेत आजही अनुभवायला मिळतो.
साठोत्तरी कालखंडात लिहिणाऱ्या कवींच्या अभिव्यक्तींची तऱ्हा वेगळी होती. कविता#आशय, कविता#रूपबंध वेगळे होते. निसर्ग, प्रेम, दुःख, विरह, मानवी संबंध, मंत्राक्षरांनी भारलेले आयुष्य हे सर्व मांडणारी कविता या काळात लिहिली गेली असली, तरी ती वेगळ्या रूपात आपल्यासमोर येत होती. काल्पनिक जगात रमण्यापेक्षा अनुभवातला सच्चेपणा व्यक्त करीत होती. ग्रेस, चिंतामणी त्र्यंबक खानोलकर, वसंत सावंत यांच्या कवितेत तो दिसतो. कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, इंदिरा संत, शांता शेळके यांच्यासारख्या आधीच्या पिढीतील कवी-कवयित्रीही स्वतःचा नव्याने शोध घेत होते. गझल हा काव्यप्रकार याच काळात जन्माला आला. सुरेश भट यांनी नव्याने त्यात जान ओतली. सामाजिक भान त्यातून व्यक्त व्हायला लागले. पण गेल्या काही वर्षांत लिहिली गेलेली गझल मात्र भट यांना ओलांडून पुढे जाऊ शकली नाही.
या काळात सुरू झालेल्या अनियतकालिकाच्या चळवळीतून पुढे आलेले दिलीप चित्रे, अरुण कोलटकर, मनोहर ओक, भालचंद्र नेमाडे, सतीश काळसेकर, चंद्रकांत पाटील, गुरुनाथ धुरी इत्यादी कवींनी प्रस्थापित काव्य परंपरेला छेद देण्याचा प्रयत्न केला. (अर्थात यातील जवळजवळ सगळेच कवी पुढे प्रस्थापित झाले.) यातील काही कवींनी भाषेचे एक नवे दालनच लोकांसमोर उघडले. भाषेची काव्यात्मदृष्ट्या केलेली मोडतोड, परंपरागत मांडणीला छेद देत शब्दांची केलेली काव्यात्म मांडणी, बोलीभाषेच्या किंवा जुन्या म्हणींचा केलेला उपयोग, लैंगिक जाणिवा व अनुभव यांनी भारलेल्या प्रतिमांचा केलेला वापर, चित्रात्मकता, नव्या-जुन्या पाश्चात्त्य व भारतीय संस्कृतीतील तसेच वाङ्मयातील संदर्भाचा वापर ही यांच्या कवितेची वैशिष्ट्ये होती. त्यानंतर लिहू लागलेल्या विलास सारंग यांनी कविता#निरुद्देशिका, कविता#प्रतिसुनिते, सापडलेल्या कविता यांसारख्या वेगळ्या रूपबंधाच्या कविता लिहिल्या. त्यांना कविता म्हणायचे की प्रतिकविता हे त्यांनी वाचकांवर सोपवले असले तरी वाचकांची भाषिक संवेदनशीलता जागवणारी ही कविता असल्याचे डॉ. म.सु. पाटील यांनी म्हटले आहे. याच काळात लिहिणारे नारायण सुर्वे आणि नामदेव ढसाळ हेही आपल्या अनुभवातला सच्चेपणा वेगळ्या शैलीत मांडत होते. हे दोन्ही कवी खऱ्या अर्थाने प्रवाह प्रवर्तक ठरले. याच काळात लिहिणारे नारायण सुर्वे आणि नामदेव ढसाळ हेही आपल्या अनुभवातला सच्चेपणा वेगळ्या शैलीत मांडत होते. हे दोन्ही कवी खऱ्या अर्थाने प्रवाह प्रवर्तक ठरले.
१९८५ ते २०१०
१९८५ ते २०१०
पाल्हाळ, पुनरुक्ती विधान स्वरूपी गद्यप्रायता, बौद्धिक चमकदारपणा, उपमा, प्रतीके व प्रतिमांचा एकसुरी वापर, चिंतनाचा अभाव अलीकडच्या ग्रामीण कवितेत पाहायला मिळतो, असे डॉ. रणधीर शिंदे यांनी या कवितेबद्दल आपले निरीक्षण नोंदवले आहे. दलित कवितेचा आवाजही काही अपवाद वगळता क्षीण होत चालला आहे असे वाटते. एवढ्या वर्षांचा सरस्वतीचा वारसा सांगणाऱ्या उच्चवर्णीयांच्या कलावादाला आव्हान देणारी, गाण्याविषयी बोलतानाच कविता#काव्यमूल्य जपणारी, मराठी भाषेत नवे शब्दभंडार खुले करणारी, व्यवस्थेला जाब विचारणारी दया पवार, यशवंत मनोहर, केशव मेश्राम, नामदेव ढसाळ यांच्या कवितेचा वारसा सांगणारी कविता लिहिली जात असली तरी ती या सर्वाच्या पुढे जाऊन काही वेगळे सांगण्याचा प्रयत्न करीत नाही आहे. अर्थात अरुण काळे,महेंद्र भवरे, प्रज्ञा पवार इत्यादींसारखे काही अपवाद आहेत. दलित जाणिवेबरोबर दलित चळवळीतले अराजक, नेतृत्व हरवलेल्या भ्रष्ट व्यवस्थेत पिचलेल्या हताश तरुण पिढीची कैफियत, आजच्या जगात हरवत चाललेली मूल्यव्यवस्था, जागतिकीकरणाच्या रेट्यात माणसाला आलेले वस्तूरूप, स्त्रीचे शोषण अशा अनेक गोष्टींचा आविष्कार त्यांच्या कवितेत दिसतो. भुजंग मेश्राम यांच्यासारख्या कवींच्या कवितेतही आदिवासी तसेच भटक्या विमुक्तांचा आदिम संघर्ष व्यक्त होतो. त्यांनी केलेला बोलीभाषेचा उपयोग पाहिल्यावर मराठी कविता प्रमाणित भाषेच्या कक्षा ओलांडून नवनव्या भाषांचे अवकाश शोधत पुढे चालली आहे हे लक्षात येते.
अनियतकालिकांच्या चळवळीतील कवितेचा आणि विशेषतः चित्रे-कोल्हटकर या द्वयीचा प्रभाव असलेली कविताही गेल्या (?) २०-२५ वर्षांत खूप लिहिली गेली. या प्रभावातून बाहेर पडून स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न काही कवी करत आहेत. एकोणीसशे नव्वदोत्तरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कवींनी कवितेसाठी चळवळ उभारण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी अनियतकालिके सुरू केली. पण हळूहळू ती त्यांच्या स्वतःच्या जगण्याची, विचारसरणीची आणि त्यांच्यासारखेच लिहिणाऱ्यांची मुखपत्रे झाली. या सगळ्याच कवींच्या जाणिवा आजच्या जगाशी जोडलेल्या आहेत. जागतिकीकरण, ऱ्हास पावत चाललेली मूल्यव्यवस्था, जगण्यात आलेले एकसुरीपण, महानगरातील झपाट्याने बदलणारे वास्तव, विखंडित होत चाललेले जगणे त्यांना हादरवून सोडत आहे. एक प्रकारचे वांझ, निर्मितीक्षमता हरवलेले जगणे जगणाऱ्या माणसाची कविता हे कवी लिहीत आहेत. त्यामुळेच अनेकदा ती बौद्धिकतेकडे झुकते. चित्रे-कोल्हटकरांच्या कवितेत असलेली संवेदनशीलता रमेश इंगळे उत्रादकरांसारखे काही अपवाद सोडले तर त्यांच्या कवितेत अभावानेच सापडते, यांच्या बरोबरीने लिहिणारे अनेक कवी आपले वेगळेपण जपण्याचा प्रयत्न करत आहेत. आजचे अस्वस्थ करणारे वास्तव त्यांना आपल्या आदर्शवत वाटणाऱ्या जुन्या दिवसांत घेऊन जाते आहे. (उदा. अरुण म्हात्रे, सौमित्र यांच्या कविता). स्मरणरंजनात रमणाऱ्या अशा काही कवींच्या कविता कथनपर किंवा वर्णनपर होताना दिसतात (उदा. दासू वैद्य, प्रवीण बांदेकर). त्यामुळे अनेकदा त्या दीर्घ व कंटाळवाण्या होतात. कदाचित आयुष्यात आलेला कंटाळा दाखविण्यासाठी तसा रूपबंध वापरला असावा, पण तो पोहोचत नाही. प्रेम निसर्ग यात रमणारी रोमॅन्टिक कविता ही सार्वकालिक आहे. ती पूर्वीही लिहिली गेली आणि आजही लिहिली जातेय. उक्त अभिव्यक्तीची तऱ्हा बदलली आहे एवढेच. वसंत आबाजी डहाक्यांच्या पावलावर पाऊल टाकत अनेकांनी राजकीय उपरोध व्यक्त करणारी कविता लिहिली. पण डहाक्यांच्या कवितेत व्यक्ती आणि समाज यांच्या परस्पर संबंधाबद्दल जी संवेदनशीलता व्यक्त होते, ती त्यांच्या परंपरेत लिहिणाऱ्या कवींमध्ये दिसत नाही. तीही वर्णनपर आणि बौद्धिक होते. नारायण कवठेकर कुलकर्णी, नरेंद्र नाईक, अशोक नायगावकर, महेश केळुसकर यांच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीवर उपहासात्मक भाष्य करणाऱ्या काही कविता लक्षणीय आहेत.१९९०नंतर लिहिणारी मंडळी फार मोठ्या प्रमाणात असली तरी गांभीर्याने लिहिणारे कमी आहेत. अजिमनवाज राही किंवा त्याच्या पिढीतील अनेक कवी कधी फार सोपी तर कधी फार गुंतागुंतीची कविता लिहीत आहेत. दलित कवितेतील आक्रोश मात्र आजही बदलला नाही.
गेल्या ३० वर्षांत स्त्रीजाणिवेची कविताही प्रामुख्याने पुढे आली.प्रभा गणोरकर, रजनी परुळेकर यांच्या पावलावर पाऊल टाकून अनेक कवयित्री लिहू लागल्या. स्त्रीच्या स्वरूपाचा शोध घेतानाच पुरुष व्यवस्थेत आजपर्यंत तिला व्यक्ती म्हणून जगण्याचा नाकारलेला हक्क, तिचे शोषण, तिला आलेले वस्तूरूप, पुरुषाशी तिचा तुटलेला संवाद आणि त्यातून आलेले एकाकीपण व तुटलेपण कवयित्री त्यांच्या कवितेतून व्यक्त करू लागल्या. या समाजात एकीकडे स्त्रीचे उदात्तीकरण करणाऱ्या तर दुसरीकडे तिचे उपभोग्य वस्तूत रूपांतर करणाऱ्या पुरुषाच्या दुटप्पीपणावर त्या कोरडे ओढू लागल्या; पुरुषाला नकार देऊन स्वतःची वेगळी सृष्टी निर्माण करण्याची भाषा करू लागल्या. हे करताना त्यांच्या शब्दात बंडखोरी आली, त्यांची भाषा आक्रमक झाली.
ग्रामीण कवितेचे दालन १९८५ नंतरच्या काळात अधिक समृद्ध झाले आहे. आनंद यादव यांच्या मायलेकरं या दीर्घ कवितेनंतर इंद्रजित भालेराव यांच्या अनेक कवितासंग्रहांनी ही कविता खेड्यापाड्यात पोहचली.कैलास दौंड , लक्ष्मण महाडिक, जगदीश कदम यांची ग्रामीण कविता लक्ष वेधून घेणारी ठरली. कैलास दौंड यांच्या 'उसाच्या कविता ', 'वसाण', 'भोग सरू दे उन्हाचा ', 'अंधाराचा गाव माझा' या कवितासंग्रहातील ग्रामीण कविता ग्राम जीवनाचे नेमके प्रत्यंतर देणारी कविता आहे . ग्रामीण जीवनाचे काव्यमय दर्शन तर त्यांतून घडतेच, पण त्याच बरोबर ग्रामजीवनातील विसंगती, त्यातील नवे प्रश्न अशा अनेक आयामांना भिडणारी ही कविता काव्यगुणानेही सरस अशीच आहे.
गेल्या ५० वर्षांतील काव्यप्रवासाकडे नजर टाकली तर लक्षात येते की, आज कविता उदंड लिहिली जातेय. कविसंमेलनेही खूप होत आहेत. कविता एकांतात वाचण्यापेक्षा ऐकण्यामध्ये लोकांना जास्त रस आहे. त्यामुळे कविसंमेलनांच्या सूत्रसंचालनालाही महत्त्व आले आहे. कविसंमेलन रंगवण्यासाठी विनोद, कधी अश्लील तर कधी बालिश शेरे यांची पेरणी केली जाते. फड जिंकणाऱ्या कविता सादर केल्या जातात आणि हीच खरी कविता आहे, असा समज झाल्याने नवे कवी त्याचे अनुकरण करतात. एकीकडे लोकानुनय करणारी सोपी, विधानवजा कविता लिहिली जाते आहे, तर दुसरीकडे चांगली कविता ही दुर्बोधच असते, असा गैरसमज पसरवून ती आपल्या वर्तुळापर्यंत सीमित ठेवली जाते आहे. अर्थात गेल्या ५० वर्षांतील कवितेत विविध प्रयोग झाले आहेत हे नाकारता येणार नाही.
माझ्या कवितेचं एक पान ... या सदरात माझ्या स्व लिखित कवितांचा संग्रह आहे. या ठिकाणी त्यातील काही कविता मी दिलेल्या आहेत. आपल्याला या कविता कश्या वाटल्या ते मला नक्की कळवा.
टिप्पण्या