राजकारण व राजकीय पुढारी
राजकारण आणि राजकीय पुढारी
जनतेचे कल्याण किंवा कल्याण करण्याचे सामर्थ्य राजसत्तेत असते. म्हणूनच जनतेच्या सुस्थितीची किंवा दुर्दशेची सर्व जबाबदारी राज्यकर्त्यांवर येऊन पडते. राजकारण म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध खलबते करून परस्परांच्या तंगड्या खेकड्या प्रमाणे ओढीत बसणे नव्हे. या प्रकारचे राजकारण म्हणजे प्रत्यक्षात पुढाऱ्यांचा खेळ व लोकांचे मरण होय. राज्य सुरळीत चालण्यासाठी व राज्याच्या उत्कर्ष व उन्नती साधण्यासाठी जे काही राज्यकर्त्यांनी करणे आवश्यक असते ते करणे म्हणजे राजकारण. राष्ट्रीय जीवनात राजकारणाला महत्त्वाचे स्थान आहे. जीवनाची इतर सर्व अंगे उदाहरणार्थ सामाजिक,धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक वगैरे सर्व अंगे राजकारणावर अवलंबून असतात. ही वस्तुस्थिती लक्षात घेतली तर राजकारणाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतः धोंडा मारून घेणे होय.
* "स्वातंत्र्यप्राप्ती नंतर देशाच्या पुढाऱ्यांनी दांभिक निधर्मीवाद व अनाकलनीय समाजवाद" अशी खुळे जनतेच्या माथी मारून एका बाजूने लोकांना खुळे केले व दुसर्या बाजूने राष्ट्र खिळखिळे करून सोडले.
* स्वराज्याचे सुराज्य परिवर्तन घडवून आणण्याचा प्रभावी उपाय म्हणजे पैशाला अवास्तव महत्त्व देणाऱ्या सध्याच्या महागड्या निवडणूक पद्धतीत आमूलाग्र बदल करणे हा होय.
* पुढाऱ्यांचा खेळ व लोकांचे मरण म्हणजे राजकारण.
* राम राज्याची कल्पना प्रत्यक्षात तेव्हाच उतरेल जेव्हा जनतेचे पुढारी सुधारतील.
* परमार्थ हे जीवनाचे आवश्यक अंग आहे हे राज्यकर्त्यांना ज्या दिवशी कळेल तो दिवस सुदिन.
* जनतेचे कल्याण किंवा अकल्याण करण्याचे सामर्थ्य राजसत्तेत असते म्हणूनच जनतेच्या सुस्थितीला किंवा दुर्दशेला सर्वस्वी राज्यकर्तेच जबाबदार ठरतात.
* जनतेचे पुढारी जेव्हा देशाचे पेढारी बनवतात तेव्हा लोकशाही धोक्यात येऊन राष्ट्राचे अधःपतन होते.
* उच्चारात समाजवाद व आचारात माजवाद असा वितंडवाद देशाच्या पुढार्यात माजतो तेव्हा राष्ट्राची अधोगती होते.
* रावण वृत्ती पोसणार्यांना राम राज्यनिर्मितीच्या कल्पना करणे केवळ व्यर्थ होईल.
* "बुद्ध हवे की युद्ध हवे" हा प्रश्नच मुळात निर्बुद्ध आहे, कारण जोपर्यंत शहाणपणाचा अभाव आहे तोपर्यंत बुद्ध व युद्ध हे द्वंव्द जगाच्या अंतापर्यंत चालतच राहणार आहे.
* आदर्शवादाच्या मृगजळामागे धावण्यात या देशाच्या पुढाऱ्यांनी ज्या महान चुका करून ठेवल्या आहेत त्या दुरुस्त करणे आता केवळ ब्रह्मदेवाला शक्य आहे.
* हिंदू लोक तत्वतः आदर्श ठेवतात भगवान श्रीकृष्णाचा परंतु प्रत्यक्षात मात्र कित्ता गिरवितात तो युधिष्ठिराचा आणि हेच भारताचा ह्रास होण्याचे प्रमुख कारण होय.
* अन्न,वस्त्र, निवारा, शिक्षण व वैद्यकीय मदत या पाच गोष्टी माणसाचे मूलभूत हक्क असून हे हक्क म्हणून राष्ट्राच्या घटनेत समाविष्ट केले पाहिजेत, असा जीवन विद्येचा स्पष्ट दृष्टिकोन आहे.
* या देशातील निवडणूक म्हणजे प्रत्यक्षात गरीब जनतेची राजरोसपणे केलेली फसवणूक होय.
* या देशातील प्रचलित लोकशाहीची पद्धत लोकांचे भले करण्यास समर्थ ठरेल असे दिसत नाही. त्यासाठी लोकशाही अधिष्ठित हुकुमशाही म्हणजेच "Dictatorial Democracy" या देशाला पोषक ठरेल अशी जीवन विद्येची स्पष्ट धारणा आहे.
* हिंदू-मुस्लिम ऐक्याचा प्रश्न आज यक्ष प्रश्न होऊन बसला आहे याचे एकमेव कारण म्हणजे या देशाच्या पुढार्यांचे गलिच्छ राजकारण होय.
* या देशातील लोकशाही म्हणजे प्रत्यक्षात "लोकांसाठी लोकांचे राज्य" असे म्हणत म्हणत लोकांच्या तोंडाला शाई फासणारी थैलीशाही आहे.
* गरिबाने कायम पाच पाच वर्षांनी मते देत रहायचे व पुढार्याने कायम सत्ता संपत्ती भोगत राहायची यालाच लोकशाही असे म्हणतात.
* नको एकादशी, नको लोकशाही, नको ठोकरशाही, पाहिजे ती हुशार व प्रामाणिक अशा कार्यक्षम लोकांच्या हातात सत्ता सुपुर्द करणारी शहाणपणशाही. स्वराज्याचे सुराज्यात परिवर्तन घडवून आणण्याचा हात एक प्रभावी उपाय आहे.
* "समाजकंटकांचे निर्दालन करणे व देशद्रोही शत्रूंना सरळ यमसदनास पाठविणे" हाच धर्म, तोच न्याय व तिच नीती.
- वामनराव पै.
टिप्पण्या