मुलांना मोबाईल वर बंदी म्हणजे गुन्हेगारीला दिलेली एक नवी संधी..!
मुलांना मोबाईल वर बंदी म्हणजे गुन्हेगारीला दिलेली एक नवी संधी..! - योगेश जाधव.
मित्रांनो, सध्या श्रध्दा वाळकर हत्याकांड प्रकरण बद्दल पुर्ण देशात चर्चेला उधाण आलेले आहे. विविध रंगाढंगाचे लोकं घटनेचे विविध कंगोरे मांडतांना दिसताहेत. काही संताप व्यक्त करताहेत. काही बरोबर काय व चुकीचे काय? यावर मतमतांतरे व्यक्त करताहेत. काही गावांमध्ये विविध निर्णय घेण्यात आलेत. पालक ही चांगलेच घाबरलेले दिसताहेत. अशातच काही गावांनी अथवा पालकांनी, घरातील ज्येष्ठांनी आपल्या मुलांना मोबाईल वर बंदी घातली. त्यांच्या मते असे केल्यास मुलं वाईट मार्गाला जाणार नाहीत. परंतु मित्रांनो कोणताही निर्णय घेण्यापूर्वी जरा तात्विक, भावनिक, मानसिक, सामाजिक अशा सर्वच चढ उतारांवर एक वेळा पुन्हा विचार करणं खुप गरजेचे आहे.
सध्याची पिढी एका नवीन जगतात वाढत आहे. या पिढीला सर्वच गोष्टी एका नव्या रुपात जन्मापासूनच मिळत जात आहेत. बाळ रडायला लागले कि आई त्याला जवळ घेण्याऐवजी त्याला मोबाईल देते. त्याला ते बदलणारे , हलणारे , मोहित करणारे जग आवडायला लागते व ते बाळ तहान भूक विसरून खेळत राहते. तिथूनच त्याला एक व्यसन जडत जाते. नंतर त्याचा बाह्य जगाशी संपर्क येतो व कौटुंबिक वातावरणाच्या पल्याड गेल्यामुळे नवीन संगतीत येतो. मुल लहान होते तेव्हा मोबाईल ने शांत केले अन आता मुल मोठ झालं म्हणून आई वडील कामात गुंतले. म्हणजे जेव्हा लक्ष द्यायला पाहिजे होते, जेव्हा त्या बाळाला खरोखर तुमची गरज होती ; तेव्हा तुम्ही त्याची ती गरज पूर्ण करू शकले नाहीत. मग कोणत्या हक्काने तुम्ही जगाला हे ओरडून सांगता कि मुलं मोठे होऊन आई वडिलांना वागत नाहीत. मुलं बदलतात? कारण त्यांना आपल्या माणसावर केलेले प्रेम काय असते? हे ठाऊकच नसते .
मुले मोठी होतात त्यावेळी आई वडिलांची भूमिका ही एका वाटाड्याची , मार्गदर्शकाची , दिशादर्शकाची असावी. या वयात मुलामुलींच्या शरीरात अनेक बदल होतात. त्यांना अनेक जाणून घ्यायचे असते. त्यांना अनेक समस्या येतात. ते घरात सांगायला , मोकळे बोलायला घाबरतात. त्यांना काय चांगले व काय वाईट हे त्यावेळी कळत नाही. कारण त्यांची काहीतरी वेगळे जाणून घेण्याची भूक तीव्र असते. मग ते ऑनलाइन दुनियेच्या संपर्कात येतात. येथे त्यांना मुबलक ज्ञान दिसते. पण ते योग्य ज्ञानाची निवड करू शकत नाहीत. त्यांना त्यांच्या शारीरिक समस्यांचे , शरीर रचनांचे , विभिन्नलिंगी आकर्षण असते. शालेय पुस्तकांमध्ये अगदी मोकळ्या पणाने समजावण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु मुलं व मुली एकत्र असल्यावर असले पाठ कसे शिकवायचे हा प्रश्न शिक्षकालाही पडतो. यासाठी मुलं व मुली वेगळे बसवून हे समजवता येते. परंतु येथेही मुलां- मुलींना शिकतांना लाज वाटते. काही शब्दांचा अर्थ व समज नीट होत नाही. मग ते घरी जावून आपल्या पालकांना विचारतात. तेथे त्यांच्या वेळी असे शिक्षण बदल नसल्यामुळे गैरसमज होतात व ते शिक्षकाला अद्वातद्वा बोलून मोकळे होतात. म्हणून शाळा व शिक्षक ही हे शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत. मग मुला-मुलींच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो. त्यांना खूप काही विचारायचे असते,. कोणालातरी काहीतरी सांगायचे असते. मग ते आपल्या मित्रांशी शेअर करतात. त्यातून त्यांना कोणत्यातरी वेगळ्या अपरिचित विश्वाची कल्पना येते/ माहिती होते व ते एकटेच या शोधाला लागतात व नको त्या गोष्टीला बळी पडतात. हा झाला एक मानसिक , कौटुंबिक , सामाजिक विचार ! आता आपण जरा आपल्या मूळ मुद्द्याकडे येवू.
श्रद्धा वाळकर ही वसईतील तरुणी. एका कॉल सेंटरवर काम करणारी मुलगी. तिचे एका मुलावर प्रेम होते. दोघांच्या धर्म व जाती वेगळ्या असल्यामुळे अथवा काही वेगळ्या कारणास्तव तिला या नात्या संदर्भात घरून नकार मिळतो. मग ते दोघ दिल्लीला स्थलांतर झाले. तिने घर सोडून दिले. तिने काही दिवसानंतर लग्न करण्याचा तगादा लावला. पण त्याला त्याने नकार दिला. व त्या नंतर अंगाला थरकाप देणारी घटना घडली. इकडे पाच - सहा महिने झाले तरी मुलीचे सोशल मिडिया वर एकही पोस्ट न दिसल्यामुळे तिच्या आईवडिलांनी मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद केली. त्याने तिला मारून टाकले. एवढ्यावरच न थांबता तिच्या शरीराचे तब्बल 36 तुकडे करून दररोज एक याप्रमाणे त्याने तिच्या शरीराची विल्हेवाट लावण्याचा ही प्रयत्न केला. परंतु त्या दरम्यान तो दिल्ली पोलिसांना सापडला. आणि सर्व घटना उजेडात आली. एवढी निर्दयता , कठोरता या नराधामात कुठून आली देव जाणे. या प्रेम या पवित्र भावनेला काळिमा फासणाऱ्या घटनेवर आधारित अनेक भावना उफाळून आल्यात. अनेकांनी विविध आरोप केले. परंतु आपल्या आजूबाजूला अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा आपण स्वतः काय शिकतो ? आपल्या मुलांना आपण यातून काय शिकवणार ? हा खूप मोठा प्रश्न आहे. पुन्हा पुन्हा अशा निर्दयी घटना घडतात. म्हणजे आपण कुठेतरी नक्कीच कमी पडतोय. यावर विचार व्हायला हवा.
वरील घटनेला ऐकून किंवा पाहून अनेक गाव स्तरावर व पालकांनी आपल्या मुलांना मोबाइल वापरू द्यायचा नाही असे ठरवले. पण वास्तवात आपण हे खरोखर योग्य करत आहोत कि नाही यावर एक दृष्टीक्षेप टाकणे खूप गरजेचे आहे. मुलांना तुम्ही जी गोष्ट घरात करू देत नाहीत ती गोष्ट मुलं कुठूनतरी मिळवण्याचा प्रयत्न करतात. ही गोष्ट तर तुम्हा सर्वांनाच मान्य असेल. मग तुमच्या या निर्णयाने कोणता मोठा फरक पडणार आहे? आजच्या आधुनिक जगत मोबाइल हे सर्वोत्तम माध्यम आहे. जे हाताच्या बोटांवर आपल्याला जे पाहिजे ते ज्ञान मिळवून देते. मग पुन्हा या बदलापासून आपण मागे जाणे म्हणजे आपण परिवर्तनाला न स्वीकारण्यासारखे होईल. आणि निसर्ग नियमाप्रमाणे ज्याने परिवर्तनाचा स्वीकार नाही केला त्याचा कालोघाने विनाश होतो. सांगण्याचा अर्थ एकच कि मुलांनी मोबाइल वापरू नये असे म्हणण्यापेक्षा मुलांनी मोबिल असा वापरावा असे सांगणे किंवा समजावणे जास्त योग्य असेल. उदा. एखाद्या ठिकाणी बोर्ड लावलेले असते, 'येथे थुंकू नका' अथवा ' येथे कचरा करू नका' . नेमके तेथेच कचरा पडलेला दिसेल अथवा थुंकलेले दिसेल. मग झाला का बदल ? ऐकलं का लोकांनी ? नाही. परंतु जर "येथे थुंका' अथवा "येथे कचरा टाका" अशी पाटी लावून जर तेथे थुंकण्याची किंवा कचरा टाकण्याची व्यवस्था केली असती तर काही प्रमाणात योग्य बदल दिसला असता. किंवा ते योग्य झाले असते. हे असेच असते. कोणत्याही गोष्टीला नाही सांगितले कि ते ओझे होते. पण त्याला जर समजावून योग्य दिशा देण्याचा प्रयत्न केला तर योग्य बदल नक्की पाहायला मिळेल.
आजच्या मुली - मुलं स्वतंत्र विचाराचे झालेत. आईवडील माझ्या मुलीला - मुलाला असे स्थळ पाहिजे , तसे पाहिजे, एवढी श्रीमंती पाहिजे अशा अनेक चाळ्यात पडलेले आहेत. पण यात मुलामुलींच्या योग्य वयातील मागण्या / तारुण्य लक्षात न घेता त्यांना दबावात व आपल्या नियमांनी चालवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मुल-मुली घराबाहेर पाय काढतात. नको त्या गोष्टी करून बसतात. मग आपल्याकडे उरतो तो फक्त पश्चाताप ! म्हणून मुलामुलींच्या मनाचा विचार करायला ही पालकांनी तयारी दर्शवली पाहिजे. काहीवेळा पालकांचा अगदी प्रमाणाबाहेरचा मोकळेपणा देखील अशा घटनांचे कारण बनतात.
प्रेम ही एक पवित्र भावना असते. प्रेम व हिंसा ह्या दोघ विरुध्द गोष्टी आहेत. जिथं हिंसा आली तिथं प्रेम होतंच केव्हा ? प्रेम त्यागाचे प्रतिक आहे. ते हिंसा कधीच मागत नाही. एक दुसऱ्याच्या सुखातच त्यांना आनंद असतो. हे खरं प्रेम आहे. परंतु आजच्या मुलींना भंगार मुलांवर प्रेम होते. चांगली मुलं त्यांना सापडतच नाहीत अथवा त्यांना ती आवडतच नाहीत. मग काही झालं कि म्हणायचं "प्रेम आंधळं असतं." अरे वेद्यानो प्रेम आंधळं असतं हा फिल्मी डायलॉग झाला. ते जरी आंधळं असलं तरी ते निर्बुध्द नसते. आपल्याला चांगलं आणि वाईट ओळखायला बुद्धी दिली आहे. बऱ्याच वेळी मुलींची जास्त चूक असते. जोपर्यंत त्याच्या कडून फायदा होतो , आपला खर्च निघतो तोपर्यंत तिला ते चालते. नंतर घरी माहित पडले कि मग त्याला नकार द्यायचा. मग त्यातून काहीतरी विपरीत घडायचे. घरच्यांनी मुलगी अप्लवयीन होती म्हणून तगादा उठवायचा. तिला जोपर्यंत फायदा होता तो कळत होता. तिला आता काय करावे लागेल हे समजते, मग मुलगी अप्लवयीन होती केव्हा ? येथे आईवडील चुकतात. यात अनेक मुलांचे जीवन बरबाद होते. हे सर्व घडू नये म्हणून आईवडिलांनी देखील आपल्या मुलांच्या बाबतीत जागृत राहिले पाहिजे. त्याला / तिला योग्य संस्कार , शिक्षण दिले पाहिजे. त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. त्यांचा जवळचा मित्र बनले पाहिजे. त्यांना कोणत्याही गोष्टीवर रागवण्यापेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मुलांच्या ठराविक वयात चुका होत असतात. त्यांना योग्यरित्या समजून घेतले पाहिजे.
मी सर्व मुला-मिलींना एकच विनंती करेल, मित्रानो प्रेम कुणावरही करा त्याला माझा किंवा तुमच्या कुटुंबाचा विरोध नाही. परंतु एकाच करा आपल्या प्रेमाला थोडी क्वालिटी राहू द्या. जीवनात प्रेम काय असते हे जर तुम्हाला जवळून समजून घ्याचे असेल ना तर तुम्ही पडल्यावर तुमच्या आई-वडिलांच्या डोळ्यात आलेले अश्रू एकदा पहा. हे निश्चल व पवित्र प्रेम आहे. ज्यात सौदेबाजी अथवा अटी नाहीत. जेथे अटी व शर्ती असतात ते नाते किंवा प्रेम नसते तो एक फक्त सौदा असतो. अशा सौदेबाजीपासून सावध राहा आणि तुम्हाला जन्म दिलेल्यांची मान कधी रस्त्यावरून जातांना खाली होणार नाही याची काळजी घ्या. प्रेमाला कधी डाग लागेल असे वर्तन करू नका. हिच तुमच्या आयुष्याची खरी जीत आहे. धन्यवाद !
लेखन : योगेश आर जाधव.
[ शिक्षक, लेखक, कवी, ब्लॉग राईटर, युट्युबर ]
टिप्पण्या