नशा एका प्रेमाची
नशा एका प्रेमाची
दिवस बराच वर आला होता. शोभा
आपल्या नवऱ्याची वाट पाहत होती.दारात जीत्रब पण तसच उभं होतं. जणू ती सुध्दा
आपल्या घरधन्याची वाट पाहत होती. चिंधी आणि संता आपल्या मायेच्या भोवती भूक लागली
म्हणून गोंडा घोळत होते. रामाचा अजून पत्ता नव्हता. तो कामासाठी बाहेर गेला होता. घरात
टोपली रिकामी पडली होती. पोटात कावळे ओरडत होते; पण ती आपल्या मुलांना समजवत होती.
शोभाला आपल्या नवऱ्याचा, आपल्या दारिद्र्याचा राग येत होता. ती आपल्या फाटक्या
नशिबाला दोष देत डोळे गाळत होती. पोरं तशीच आईच्या मांडीवर झोपी गेली होती. काही
वेळानंतर रामा घरी आला. पाठीशी काहीशी धान्याची पुरचुंडी बांधून आणली होती. शोभाने
त्याला पाणी दिले. त्याच्याही पोटात कावळे कावकाव करत होती. पण काय करणार ? तो
बोलू शकला नाही. शोभाने मग पटकन रांधायला घेतले. पोरही जागी झाली होती. ती आपल्या
बापाजवळ घुटमळू लागली.
जेवणं आपटली. रामा तसा उठला अन कामाला
निघाला. त्याला आपल्या मुलांना शिकवायचे होते. पण पदरी पैसे नव्हते. त्याने अनेक
मास्तरांकडे चकरा मारल्या. वेळेवर पायाही पडला. सावकाराच्या पाया पडला. गाव तसं
छोटं च होतं. शिरवाळीच्या जवळच दोन किलोमीटर वर एक गाव होतं ‘कामतगाव !’ या गावला
जायचं म्हणजे, मध्ये एक ओढा लागायचा. यावर तसा रस्ता पार करायला कच्चा पूल होता. पण
पावसाळ्यात मात्र येथे बोटीने अथवा पोहूनच जाव लागे. तेथे जावून तो गणा मास्तरला
भेटला. आपल्या मुलांविषयीची कळकळ त्याने व्यक्त केली. मास्तरला दया आली. पोरांचे अॅडमिशन
झाले. रामा आज त्याच्या फाटक्या संसारात देखील स्वतःला खूप आनंदी पाहत होता. त्याची
मुलांना शिकवण्याची इच्छा पूर्ण होणार होती. तो सकाळी लवकर उठून आता लवकर काम करून
मुलांना शाळेला सोडायला जात होता. मुलंही मन लावून अभ्यास करत होती. रामा व शोभा
हे पाहून खूप खुश होते. शोभाही आता जास्तीचे काम करून आपल्या फाटक्या संसाराला
ठिगळ होण्याचा प्रयत्न करीत होती. काही दिवसा नंतर पावसाळ्याचे दिवस सुरु झाले.
ओढ्याला पूर आला अन त्यावरचा लाकडी पूल वाहून गेला. मग त्याठिकाणी बोट चालू लागली.
बोटवर दररोज जायचं म्हटलं तर ते रामाच्या खिशाला परवडणारे नव्हते. कारण बोट वर
जाण्या व येण्यासाठी चार रुपये लागत होते. म्हणून रामा विचार करू लागला. शेवटी तो
स्वतः आपल्या मुलांना खांद्यावर बसवून पोहत जावून शाळेला सोडायचा. असे कितीतरी
दिवस रडत-कुडत तर कधी हसत-खेळत जात होते.
मुले आता मोठी झाली होती. त्यांच्या अपेक्षा
वाढल्या होत्या. मुलांची शिकण्याची इच्छा पाहून रामा ला बरे वाटले. पण पैसा कुठून
आणायचा या घोरात तो बुडत चालला होता. शेवटी त्याने आपली उदरनिर्वाहाची तुटपुंजी
जमीन सावकाराकडे गहाण ठेवली. सावकाराकडे कामाला लागला. हातात थोडे पैसे घेतले. मुलांना
शहरात शिकायला पाठवले. रामाच्या आपल्या मुलांवरील वेड्या प्रेमाला वर्णन करायला
शब्दच नव्हते. मुलही शिष्यवृत्ती वैगरे , काही घरून असे करत शिकत होते. संता आता
बारावी ला होता. येथे कॉलेजला असतांना चिंधीची एका मुलाबरोबर मैत्री जमली. त्याचे
नाव होते मोहन. चिंधी बीए च्या शेवटच्या वर्षाला होती. मोहन ही त्याच कॉलेज मध्ये
बीकॉम करत होता. त्याची ही परिस्थिती काही एवढी श्रीमंतीची नव्हती. मोहन व चिंधीची
मैत्री दिवसेंदिवस अतिशय घट्ट होत जाते. त्यांचे एकमेकांबरोबर वेळ घालवणे आता वाढत
चालले होते. ते दोघही आपसांत मनसोक्त व्यक्त होत होते. आता त्यांची मित्रता एका
नव्या शिखरावर पोहचली होती. पाहता पाहता या मैत्रीचे प्रेमात रुपांतर होते. त्या
दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते.
शोभा व रामा आपल्या मुलीच्या वाढत्या वयाबरोबर चिंतेच्या
खाईत ढकलले जात होते. त्यांना आता चिंधी
च्या लग्नाची काळजी लागून होती. ते, “कुठून पैसे जमतील?” या घोरात रात्र रात्र झोपत
नव्हते. इकडे मात्र चिंधी आणि मोहनने एकमेकांशी लग्न करण्याचे ठरवून टाकले होते. कधी
टेकडीच्या उंच माथ्यावर निसर्गाची झालर अंगावर घेत, तर कधी रिमझिम पावसात भिजत, कधी
झाडांच्या मागे लपंडाव खेळत तर कधी मोकळ्या आभाळाचे छत अंगावर घेवून मोकळ्या रानी
हिंडत असतांना. अशा कितीतरी आठवणींचे गाठोडे त्यांनी आपल्या उराशी बांधून ठेवले
होते. एक दिवसा त्या दोघांनी आपापल्या घरी लग्नाविषयी विचारण्याचे ठरविले. शोभा अन
रामा तर चकितच झाले. रामा चा चेहरा लालबुंद झाला. त्याला आता काय करावे ते सुचेना.
रागाच्या भरात तो काहीतरी करेल याची जाणीव झाली तसं त्याला शोभाने सावरण्याचा
प्रयत्न केला. त्याला आता आपल्या एकेक वस्तूची आठवण होऊ लागली. त्याने घेतलेल्या
श्रमाची हीच किमत मोजावी लागणार काय ? म्हणून मन तांडव करत होते. “समाज काय म्हणेल
आपल्याला?” याचा विचार करून करून रामाला जगावे कि मरावे काहीच सुचत नव्हते. त्याच्या
अलौकिक प्रेमाची चिंधी आणि मोहन यांच्या लौकिक प्रेमापुढे हार होतांना दिसत होती.
शेवटी कसेबसे चार लोकांनी समजवले. मुलीच्या सुखातच तुला आनंद मानला पाहिजे म्हणून
सांगितले. तरी मन मात्र काही राजी होईना. जसे तसे लग्न झाले. चिंधी मोहन बरोबर
त्याच्याघरी गेली. आपल्या जीवनात कधीतरी डोकावलेल्या मोहन रुपी वळणाने चिंधी च्या
जन्माला येण्या अगोदरच्या प्रेमाला विसर पाडला होता. रामा इकडे मनातच कुढत कुढत
दिवस काढत होता. शोभाही पार खचून गेली होती. जणूकाही त्यांच्या अंगातील काम
करण्याची ताकदच संपून गेली होती. ते कसेबसे काम करून व स्वतःच्या मनावर दगड ठेवून
सावकाराचे कर्ज फेडत होते.
चिंधी आपल्या आवडत्या जोडीदार
सोबत लग्न झाले म्हणून खुश होती. ते देव दर्शनाला, गारव्याच्या ठिकाणी, बागीच्यातून,
टेकड्या व डोंगर माळातून निसर्गाचे लेणं अंगावर घेत खूप हिंडले. त्यात बरेच दिवस
कसे गेले कळलेच नाही. त्या दोघांचे एकमेकांवरचे प्रेम पाहून मोहनचे आई वडीलांचा ही
मुलांवरचा राग हळूहळू कमी होत गेला. मुलांच्या खुशीतच त्यांनी आपला आनंद मानून
घेतला. थोड्या दिवसांनी मोहन ला एका कंपनीत जॉब मिळाला. तो हि जाम खुश झाला. असे
आणखी काही दिवस गेले. इकडे रामा व शोभा ला हुरहूर लागली होती. मुलगी जावून बरेच
दिवस झाले होते. शोभला मुलीला भेटावसं वाटत होतं. तिने तसं रामा जवळ भीत भीतच विषय
काढला. तसा रामा तिच्यावर खेकसला. ती मनात कुढू लागली. अर्थात रामाला मुलीला भेटावसं
वाटत नव्हतं असे नव्हे. पण वारंवार त्याच्या मनाला झालेल्या जखमा पुन्हा ओलावत
होत्या. त्या नव्याने वेदना देत होत्या. आरडून आरडून सांगत होत्या की तू कुठतरी
कमी पडला. मी काय काय आणि कुठे कमी पडलो होतो ? याचा रामा पुन्हा पुन्हा विचार करू
लागला. मध्येच तो डोळे गाळत होता. संता आपल्या घरातील परिस्थिती पाहत होता. पण
तोही आपल्या नव्या वाटेने निघून गेला. असे काही वर्ष लोटले गेलेत.
काही
वर्ष चिंधी व मोहन चे चांगले चालले होते. पण नंतर मात्र त्यांच्या जीवनात नशिबाने
पाठ फिरवली असे म्हणण्यास हरकत नाही. मोहन ज्या कंपनीत कामाला होता त्याच कंपनीत
एक सुंदर मुलगी राधा कामाला होती. राधा व मोहन ची खुर्ची आजुबाजुलाच होती.
दोघांमध्ये असेच कधीतरी बोलचाल व्हायची. यात त्यांची मित्रता एक कलीग म्हणून वाढतच
गेली. ते आता एकमेकांशी मोकळेपणाने बोलत असत. एकमेकांविषयी विचारपूस करत असत. एके
दिवशी मात्र त्यांना बोलतांना चिंधी ने पहिले. ते तिला मात्र आवडले नाही. तसे तिने
त्याला सांगितले देखील. मोहन ने समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या दोघांमध्ये
वाद वाढतच गेला. आता दोघांतला संवाद ही नीटसा होत नव्हता. एकमेकांवरची चिडचिड वाढत
गेली. कोणाचेही कामात मन लागेना. मग कधीतरी त्याच्या मनात यायचे कि आपण उगाच
हिच्यासोबत लग्न केले. आपण राधा सोबत गोष्ट केली तर? अशा गोंधळलेल्या अवस्थेत तो
जीवन जगत होता. की करावे ते काही सुचेना. या गोंधळातच त्याने कामावर चे लक्ष कमी
केले. आणि यातच त्याच्या हातून कंपनीचे नुकसान झाले. कंपनीच्या मालकाने ते नुकसान
भरून घेवून त्याला कामावरून काढून टाकले. आता मोहनचे अजूनच वाईट दिवस सुरु झाले.
दारिद्र्याची सीमारेषा त्याला आता स्पष्ट दिसत होती. दिवसेंदिवस परिस्थिती हलाखीची
होत चालली होती. दोन वेळचे खाण्याची सुध्दा मारामार होत होती. त्यातच मोहन ला
व्यसन जडले. तो आता शुद्धीवर राहत नव्हता. चिंधी च पार आयुष्य नवीन वळणावर येवून
उभे होते. काय करावे ते सुचत नव्हते. इकडे मायबापाचे ऐकले नाही म्हणून तिकडे परत जायला
तिला भीती वाटत होती. शेवटी रडत कुडत ती दिवस पार करत होती. पण, एक दिवस तिला हे
सर्व असह्य झालं आणि तिने आपल्या आईकडे परत जाण्याचे ठरवले. ती आपल्या माहेरी आली.
तिला पाहून बापाला राग आला. पण तो तसाच गप्प राहिला. मुलगी खूप दिवसांनी भेटली
म्हणून मायेच्या मनाला खूप बरे वाटले. हवापाण्याच्या गप्पा झाल्या. चिंधीचे बोलता
बोलता हुंदका दाटून आला. तिने आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. अन त्याच्या
आनंदात विरजण पडले. मोहन चा रागही आला. परंतु कोणी काही न बोलले नाही. चिंधी
माहेरी राहायला लागली. तीही आपल्या आईबरोबर शेतात काम करून पोट भरत होती. संताचं
ही लगीन झालं होतं. त्याची बायको ही चिंधी घरी आल्यापासून तोंड फुगवून बसली होती.
पण काही न बोलता कसनुस करत आवरत होती. चिंधी च्या मनाला ते समजत होते. कोणाचे दिवस
माहेरी जात नाहीत हे तिच्या मनाला पटत होते. ती आपल्या आईवडिलांकडे मोहन ला समजवण्या
विषयी सांगत होती. शेवटी न राहवून रामा तिच्या सासरी गेला. चार माणसांनी त्याला
समजावले. काम करण्यासाठी सांगितले. व आपापल्या घराला परतले. थोड्या दिवसांनी मोहन
कामाला लागला. तो शेतीतच राबू लागला. हळूहळू त्याने व्यसन ही सोडण्याचा प्रयत्न
केला. पण ते काही त्याच्या पासून लवकर दूर जात नव्हते. शेवटी त्याने व्यसन सोडले.
काम ही करू लागला. हळूहळू परिस्थिती सुधारली. ही बातमी चिंधी ला समजली. अन तिच्या
प्रेमाला परत पंख फुटले. चिंधी मोहन वर जीवापाड प्रेम करत होती. तिच्या मनात आलेले
प्रेमाचे भाव तिच्या ओठावर येत होते...
आस लागली संसाराची मनी गं ऽऽ
रानात राबतोय कुन्बिनीचा धनी गं ...ऽऽ
आपल्या मुलीच्या चेहऱ्यावारील आनंदाचे भाव पाहून रामा ही भारावून गेला. अलौकिक प्रेमापुढे लौकिक प्रेमाचा विजय झाला होता. परंतु या मायेच्या वेड्या मनाला मुलांच्या सुखाने भारावून टाकले होते. चिंधी आपल्या घरी परत गेली. पुढे त्या दोघांच्या जीवन वेलीवर एक फुलही उमलले. अन सर्वच सुखाच्या व प्रेमाच्या या गारव्यात पार गढून गेले ...!
लेखन : योगेश आर जाधव
शिक्षक, लेखक, कवी, ब्लॉग राईटर, युट्युबर.
WhatsApp Group : Click here
Telegram channel : Click here
टिप्पण्या